ज्योतिष मालिका - भाग 1 - मांगलिक कुंडली समजून घेणे

Published Date : August 08, 2021

ज्योतिषाचे जुजबी ज्ञान असणार्‍याला देखील हे माहीत असते की, पत्रिकेत 1, 4, 7, 8, 12 या स्थानी मंगळ असला की ती त्या कुंडलीत विवाहाच्या दृष्टीने मंगळ दोष आहे असे म्हणतात. त्यामागचा सामान्य तर्क असा की, विवाहाच्या दृष्टीने सातवे आणि आठवे स्थान हे सगळ्यात महत्त्वाचे असते, आणि वर सांगितलेल्या पाचही स्थानांमधील मंगळ सातव्या किंवा आठव्या स्थानाला पाहतो. हाच तर्क वापरुन दाक्षिणात्य पद्धतीनुसार दुसर्‍या आणि पाचव्या स्थानातील मंगळ देखील विवाहसौख्याची हानी करतो.

पहिल्या म्हणजे लग्न स्थानातील मंगळ- लग्न स्थान हे स्वभावदर्शक स्थान आहे. या स्थानी असलेला कोणताही ग्रह स्वभावावर आणि व्यक्तिमत्वावर परिणाम करतो. या स्थानी असलेल्या मंगळामुळे व्यक्ती आवेगशील, विचाराशिवाय कृती करणारी, आक्रमक, दुष्ट प्रवृत्तीची, आणि टोकाच्या आवडी-निवडी असलेली असते. या मंगळाची सप्तमावर दृष्टी येत असल्यामुळे वैवाहिक जीवन असंतुष्ट राहते, वैवाहिक सुखात कमतरता येते, आणि याला कारण म्हणजे, मंगळाचा स्वभाव.

चौथ्या स्थानातील मंगळ- चौथे स्थान हे भौतिक सुख, जमीनजुमला, वाहन याचे असल्यामुळे चतुर्थात मंगळ असल्यास कुटुंब सौख्य आणि वाहन सौख्य कमी होते, जन्मभूमीपासून लांब राहावे लागते. नातेवाईकांमुळे वैवाहिक सुखात कमतरता येते. अशा पुरुषांचा दुसर्‍याच्या पत्नीशी गैर संबंध येऊ शकतो. चतुर्थातील मंगळ शुभ दृष्ट असल्यास असा पती आपल्या पत्नीच्या कह्यात राहतो. या स्थानातील  मंगळाची दृष्टी सप्तम स्थानावर येत असल्यामुळे पती-पत्नीत सुसंगतता किंवा compatibility नसते. या स्थानातील मंगळाचे खराब परिणाम सप्तम आणि अष्टम स्थानातील मंगळाच्या तुलनेत कमी असतात.

सातव्या स्थानातील मंगळ- सप्तम स्थान हे जोडीदार, भागीदारी आणि वैवाहिक सुखाचे स्थान आहे. या स्थानातील मंगळ सर्वात जास्त उपद्रवी म्हटला जातो. विवाहाच्या बाबतीत पुरुषाच्या पत्रिकेत सप्तम स्थानातील आणि स्त्रीच्या पत्रिकेत अष्टम स्थानातील मंगळ सर्वात जास्त हानिकारक असतो. कारण हा मंगळ वैधव्य, घटस्फोट, खून यांसारखे गंभीर परिणाम देऊ शकतो. सप्तमातील शत्रूगृहीचा आणि अशुभदृष्ट मंगळ जोडीदाराच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकतो. अनैतिक संबंध ठेवणारा किंवा त्याकडे प्रवृत्त करणारा हा मंगळ असतो. अशा जातकाची पत्नी आक्रमक प्रवृत्तीची असते तसेच चारित्र्यहीन असू शकते. हा मंगळ पत्नीचे आरोग्य चांगले ठेवत नाही. सप्तमात मंगळाची शनीशी युती अनैतिक संबंध सुचवते. येथे मंगळ आणि केतूची युती असल्यास ती समलैंगिक संबंध सुचवते. या स्थानातला मंगळ कडक आणि विघातक समजला जातो.

आठव्या स्थानातील मंगळ- स्त्रीच्या पत्रिकेत अष्टम स्थानातील मंगळ हा सर्वात हानिकारक समजला जातो, कारण आठवे स्थान विवाहसौख्याचे आणि सौभाग्याचे आहे. हा मंगळ जातकाचे आयुष्य कमी करतो. येथील मंगळ असंतुष्टता आणि संघर्ष दाखवतो. सुखी वैवाहिक जीवन लाभत नाही. अशा पुरुषांचा दुसर्‍या स्त्रीकडून शारीरिक सुख मिळवण्याचा कल असतो. हा मंगळ विवाहातील विलंब दर्शवतो. लग्न लवकर झाल्यास कमी काळातच घटस्फोट दाखवतो. स्त्रीच्या पत्रिकेत असा मंगळ असल्यास तो तिच्या पतीमध्ये मानसिक विकार आणि हताशा निर्माण करतो.

बाराव्या स्थानातील मंगळ- हे स्थान शय्यासुखाचे असल्यामुळे येथील मंगळ सुखात कमतरता आणतो आणि अनैतिक संबंधांवर खर्च करण्याची प्रवृत्ती दाखवतो.

दुसर्‍या स्थानातील मंगळ – या स्थानातील मंगळ हा बर्याच वेळा दुर्लक्षिला जातो. येथील मंगळाची अष्टम स्थानावर दृष्टी येत असल्यामुळे हा सुद्धा जातकाच्या पत्रिकेत वैवाहिक सुखात अडचणी निर्माण करू शकतो. दुसर्या स्थानाचा भावेश जर पापग्रह असेल, तर तो पत्नीवियोग किंवा वैवाहिक सौख्यात कमतरता आणतो. या स्थानातील मंगळाची दृष्टी पाचव्या स्थानावर येत असल्याने अशा जातकाच्या मुलांचे आरोग्य चांगले राहात नाही. आर्थिक बाबींवरून पती-पत्नीत झगडा होतो.

पाचव्या स्थानातील मंगळ- हे स्थान संतती आणि विद्येचे आहे. स्त्रीच्या कुंडलीत हा मंगळ विशेष अभ्यासला गेला पाहिजे. स्त्रीच्या पत्रिकेतील असा मंगळ संतानहीनता, गर्भपात, सिझेरियन दर्शवतो. तसेच तो तिचे सौभाग्य आणि तिच्या पतीचे आयुष्य दाखवतो. त्यामुळे स्त्रीच्या पत्रिकेत पंचमस्थ मंगळ हा दोषकारक ठरतो, पुरुषाच्या नाही. त्यामुळे, मंगळदोष असलेल्या पुरुषाशी पत्रिका जुळवताना जर स्त्रीच्या पत्रिकेत पाचव्या स्थानात मंगळ असेल, तर त्या दोघांमध्ये compatibility साधता येऊ शकते.

मंगळाची ही स्थानगत फले अतिशय ढोबळ आहेत. एखादी कुंडली पाहताना या फळांबरोबरच मंगळ कोणत्या राशीत आहे, त्याचे इतर ग्रहांशी असलेले शुभाशुभ संबंध, मंगळाची स्थिती (वक्री, अस्त, मार्गी), नवमांशातील ग्रह स्थिती, महादशा या सर्वांचा एकत्रित विचार केला पाहिजे.

Team Kedar