मागच्या लेखात मंगळदोष असलेल्या पत्रिकेतील मंगळाची स्थानगत फळे आपण पहिली होती .त्याच अनुषंगाने आपण आता प्रत्येक स्थानातील मंगळाचा सखोल विचार करू या .
पहिल्या म्हणजे लग्न स्थानातील मंगळ - प्रथम स्थान हे व्यक्तिमत्व आणि स्वभावदर्शक असते . या स्थानावरून व्यक्ती शरीरयष्टी ,त्याचे रूप ,शारीरिक बळ रोगप्रतिकारक क्षमता ,त्याचा इच्छ आकांक्षा वगैरेचा बोध होतो . या स्थानी मित्र राशीचा ,स्व-राशीचा ,उच्च राशीचा ,शुभ दृष्ट किंवा शुभ कर्तरीत असलेला मंगळ त्या व्यक्तिमत्वाला गुण बहाल करतो .ह्या व्यक्तीत धडाडी ,साहस ,ऊर्जा , आत्मविश्वास ,स्वाभिमान,पराक्रम हे गुण असतात . ह्याउलट जर हा मंगळ शुभ नसेल ,तर आक्रमकता ,अतिरेकीपणा ,अविचारीपणा आणि दुराभिमान ,दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याची वृत्ती ,पराकोटीचा हट्टीपणा हट्टीपणा वगैरे दुर्गुण त्या व्यक्तिमध्ये असू शकतात .
या स्थानातील मंगळाची दृष्टी चतुर्थ ,सप्तम आणि अष्टम स्थानावर येत असल्यामुळे तो कुटुम्बसौख्य जोडीदाराकडून मिळणारे शारीरिक सुख ,वैवाहिक जीवन यावर परिणाम करतो .
मंगळ हा अग्नितत्वाचा आणि पुरुष ग्रह आहे ,त्यामुळे पुरुषाच्या स्वभावासाठी तो विशेष अनुकूल आहे .आत्ताच्या काळात जोडीदाराचा स्वभाव जर पूरक नसेल तर स्वतः च्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जातक अतिशय साहसी विचार करू शकतो किव्हा तशी पावलेही उचलताना दिसतो .स्त्रियांच्या बाबतीत विचार केला ,तर पूर्वी च्या काळी धडाडी ,साहस ,आक्रमकता असलेल्या स्त्रीला तिचे हे गुण दाखवण्यासाठी पुरता वावच नव्हता कारण त्या काळी ती घराच्या चार भिंतींमध्ये बांधलेली होती .पण आता धडाडी, शौर्य ,स्वाभिमान ,राष्ट्राभिमान यांसारखे गुण असलेली मुलगी प्रचंड आत्मविश्वासाने समाजाला गौरवान्वित करताना सुद्धा दिसू शकते . आणि हा गुण स्वागतार्ह मानला जातो . अशा पत्नीचा पति देखील तिच्या ह्या गुणांचा अभिमान बाळगू शकतो .
लग्न स्थानी असलेला मंगळ ,त्याची महादशा /अंतर्दशा /त्यावरून इतर ग्रहांचे गोचर भ्रमण सुरु असेल त्यावेळी अपघात ,मेंदूचे विकार ,डोक्याला इजा ,चेहऱ्यावर अपघाताच्या खुणा ,भाजणे ,कापणे ,रक्ताचे विकार अशी फळे देताना दिसतो .
कुंडलीत प्रथम स्थानी मंगळ असलेली काही मान्यवर व्यक्तिमत्वं - मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी , बिल क्लिंटन , अभिनेता रणवीर कपूर .