मागच्या लेखात आपण प्रथम स्थानातील मंगळाचे गुण-दोष बघितले. त्याच क्रमात आता द्वितीय स्थानातील मंगळाचे फलित बघू या. येथे आपण फक्त विवाहसौख्याच्या दृष्टीनेच मंगळाचा विचार करत आहोत.
दुसर्या स्थानातील मंगळ – दुसरे स्थान हे धन, संपत्ती, कुटुंब, वाणी, चेहरा, घसा, डोळे यांचे कारक स्थान आहे. या स्थानातील मंगळ विवाहसौख्याच्या संदर्भात बर्याच वेळा दुर्लक्षिला जातो. हा मंगळ कुटुंब स्थानी असल्यामुळे, तो कुटुंब सौख्याची हानी करू शकतो. बोलण्यातील परखडपणा आणि अधिकारवाणीमुळे जोडीदाराशी किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींशी वाद-विवाद होण्याचे प्रसंग उद्भवू शकतात. येथील मंगळाची अष्टम स्थानावर दृष्टी येत असल्यामुळे हा जातकाच्या कुंडलीत वैवाहिक सुखात अडचणी निर्माण करू शकतो. त्याशिवाय दुसर्या स्थानाचा भावेश जर पापग्रह असून अशुभ संबंधात असेल तर तो पत्नी वियोग किंवा वैवाहिक सौख्यात कमतरता आणण्याची संभावना असते. या स्थानातील मंगळाची दृष्टी पाचव्या स्थानावर येत असल्याने अशा जातकाच्या मुलांचे आरोग्य चांगले न राहणे किंवा आर्थिक बाबींवरून पती-पत्नीत झगडा होण्याची शक्यता असते.
या स्थानात अग्नी तत्वाचा म्हणजे मेष, सिंह आणि धनु राशीतला मंगळ हा जातकाचे धन, आरोग्य आणि भाग्य यात कमतरता आणतो. हा मंगळ जर कुठल्याही पाप ग्रहाच्या युतीत आणि अग्नी तत्वाचा असेल, तर हे परिणाम जास्त अशुभ ठरतात. हा मंगळ पैशाचा उपभोग घेऊन देत नाही.
निसर्ग कुंडलीचा विचार करताना या स्थानातील मंगळ स्वस्थानाला म्हणजेच वृश्चिक राशीला आणि आठव्या स्थानाला बघतो. त्यामुळे त्या मंगळाची दाहकता वैवाहिक सुखाच्या दृष्टीने बर्याच अंशी कमी होते.
म्हणजेच एकंदरीत, ग्रंथोक्त मंगळदोष आणि वर्तमान काळाच्या संदर्भात असलेला मंगळदोष हा अगदी भिन्न पद्धतीने आणि तर्कसंगतपणे तपासावा लागेल.
शिवाय नवमांशात भावस्थ मंगळाची स्थिती, तो कोणत्या राशीत आहे यावरून जातकाचे लैंगिक जीवन, जोडीदाराबद्दलची निष्ठा, प्रतारणा याचा बोध होतो. म्हणजे जातकाच्या कुंडलीत मंगळ दोष असेल परंतु नवमांशात तो जर शुभग्रहदृष्ट किंवा नीचीचा असेल तर त्याचे गुणधर्म नक्कीच बदलतील, त्यातील आक्रमकता आणि दाहकता कमी असेल.
तर अशा प्रकारे, मंगळ दोषाची स्थानगत फले आपण बघितली. आता, यापैकी काही अपवाद म्हणजे, लग्न स्थानी मेषेचा, चतुर्थात वृश्चिकेचा, सप्तमात मकरेचा, अष्टमात कर्केचा / सिंहेचा आणि व्ययात धनेचा मंगळ असल्यास तो मंगळ दोषरहित होतो. या वरील पाचही स्थानात बुधाच्या म्हणजेच मिथुन किंवा कन्या राशीत असलेला मंगळ निर्दोष होतो. याशिवाय, मंगळ कोणत्याही स्थानात सूर्याबरोबर अंशात्मक युतीत असल्यास तो दुर्बल होतो. तसेच नवमांशात मंगळ नीचीचा झाल्यास त्याचे अशुभत्व कमी होते. त्याशिवाय, कर्क आणि सिंह लग्नाला मंगळ योगकारक असल्यामुळे मंगळाचा दोष तितकासा राहात नाही.
तसेच, जर या वरील स्थानांमधला मंगळ स्वराशीचा किंवा उच्चीचा असेल, शुभ कर्तरीत असले किंवा शुभ दृष्ट असेल तर मंगळ दोषाची तीव्रता कमी होते.
यानंतर आपण मंगळाशी इतर ग्रहांच्या युतीचा विचार करूया.
मंगळ-शनि युती – ही दोन अगदी भिन्न प्रकृतीच्या आणि बलाढ्य पापग्रहांची युती आहे. सप्तमात मंगळाची शनीशी युती अनैतिक संबंध सुचवते. मंगळदोष असलेल्या कुंडलीत मंगळ-शनिची युती असल्यास ती वैवाहिक सौख्यासाठी अत्यंत अनिष्ट असते. अविचाराने किंवा विचार न करता कृती करणे किंवा कृती न करता नुसता विचारच करणे हे दोष मंगळ-शनि युतीमुळे येतात. हीच युती जर मकर राशीत आणि उपचय म्हणजे 3, 6, 10, 11 या स्थानात असेल, तर मात्र ती अत्यंत प्रभावी ठरते.
मंगळ-चंद्र युती – या युतीला लक्ष्मी योग म्हटले जाते. आर्थिक दृष्टीने पाहील्यास ही युती शुभ फल देते. परंतु, स्त्रीच्या कुंडलीत सप्तम किंवा अष्टम स्थानात ही युती असल्यास ती गर्भाशयासंबंधी विकार दर्शवते.
मंगळ-शुक्र युती – हे दोन्ही ग्रह शारीरिक सुखाशी निगडीत आहेत. त्यामुळे शारीरिक सुखाचा विचार करताना ही युती तपासली पाहिजे. पुरुषाच्या कुंडलीत शुक्र हा पत्नीकारक, तर स्त्रीच्या कुंडलीत मंगळ पतीकारक असतो. त्यामुळे, ही युती लग्नी असणार्याची कामेच्छा प्रबल असते. ही शुभापेक्षा अशुभ फल देणारी युती आहे. नैसर्गिक कुंडलीत प्रथमस्थानी मंगळाची मेष रास आणि सप्तम स्थानी शुक्राची तूळ रास येते. त्यामुळे त्यांची एकमेकांवर दृष्टी शुभ फल देऊ शकते.
मंगळ-बुध युती – मंगळ म्हणजे कृती आणि बुध म्हणजे विचार! त्यामुळे त्यांचा समतोल नसेल, तर संघर्ष निर्माण करणारी ही युती आहे.
मंगळ-सूर्य युती - हे दोन्ही ग्रह उग्र आहेत. त्यामुळे त्यांची युती अहंकार निर्माण करते. यामुळे पती-पत्नीत लहान-सहान कारणावरून भांडणं होऊ शकतात.
मंगळ-गुरु युती – ही युती गुरुच्या सत्वगुणाचा र्हास करणारी आहे. कारण या युतीत मंगळ अधिक प्रभावी ठरतो.
मंगळ-राहू युती – हे दोन्ही ग्रह अहंकारी आहेत. त्यामुळे वैवाहिक दृष्टीने अनिष्ट फल देतात. सप्तमातील मंगळ-राहू युती द्विभार्या योग सुचवते.
मंगळ-केतू युती – ही युती देखील मंगळ-राहू युतीसारखेच फळ देते. सप्तम स्थानातील मंगळ आणि केतूची युती समलैंगिक संबंधाला पूरक ठरू शकते.
मंगळ-हर्षल युती – हर्षल हा कामवासना देणारा ग्रह आहे. मंगळ आणि हर्षल हे ग्रह जन्मकुंडलीत युतीमध्ये कोणत्याही स्थानात आले, तरी विवाहात विलंब, अपयश किंवा घटस्फोट यासारखी अनिष्ट फळे देतात.
वेळेच्या अभावी, या वेगवेगळ्या युतींची स्थानगत फळे आपण पाहू शकणार नाही.
कुंडली जुळवताना एकाच्या कुंडलीतील मंगळासमोर दुसर्याच्या कुंडलीत मंगळ नसल्यास किंवा शनीचा, रवीचा किंवा राहूचा जाब किंवा दाब असला की, मंगळदोष राहात नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे, मंगळ दोष हा 75% शनि, राहू, केतू आणि 25% सूर्यामुळे समतोल होऊ शकतो, असे म्हणता येईल. हा म्हणजे काट्याने काटा काढण्यासारखा प्रकार आहे. एका पापग्रहाला दुसर्या पापग्रहाने शह देऊन त्याचा दोष कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. याउलट, मंगळ या पापग्रहासमोर दुसरे शुभ ग्रह म्हणजे गुरु किंवा शुक्र असले तरीही मंगळाचा दोष कमी होऊ शकतो.
मंगळ दोष बघताना बरेच ज्योतिषी लग्न कुंडली व्यतिरिक्त, चंद्र किंवा शुक्रापासून मंगळाची स्थितीसुद्धा पाहतात आणि मग अशा 17 ते 18 प्रकारे कुंडलीवर ‘मांगलिक कुंडली’ हा शिक्का लागतो. म्हणजे, तर्क वापरला तर, कुंडलीला मंगळदोष असणे आणि नसणे याचे प्रमाण 50-50% असायला हवे; नव्हे, असतेच. मग मंगळाचा इतका बागुलबुवा का केला जातो? सर्वसाधारणपणे मंगळाची भीती लोकांमध्ये असतेच आणि बर्याचदा ज्योतिषी सुद्धा ही भीती वाढवतात. मुलीच्या कुंडलीला मंगळ असल्यास मुलाच्याही कुंडलीला मंगळ असायलाच हवा, आणि तसे असले तरच त्यांचे वैवाहिक जीवन सुखावह होईल असे मानणे चुकीचे आहे. वस्तुतः इतर ग्रहांप्रमाणेच मंगळाचा विचार, त्याचे स्थान, राशी, त्याचे इतर ग्रहांशी असलेले शुभाशुभ संबंध, मंगळाची स्थिती (वक्री, अस्त, मार्गी), नवमांशातील ग्रह स्थिती, महादशा वगैरेंच्या संदर्भात एकत्रितपणे केला पाहिजे. ज्योतिषाने समुपदेशन करताना जातक आणि त्याच्या माता-पित्याच्या मनातून मंगळाची भीती काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तसे करताना मंगळाची सकारात्मक बाजू सुद्धा समजावून दिली पाहिजे.
मंगळदोषाच्या कुंडलीत मंगळाच्या महादशेत आणि अंतर्दशेत मंगळाची अशुभ फळे तीव्रतेने अनुभवास येतात. त्यामुळे, जीवनकालात विवाहापासून ते वृद्धापकाळापर्यंत जर ही महादशा येतच नसेल, तर तो मंगळ कमी अनिष्ट करतो.
मंगळदोष परिहार करण्यासाठी सर्वसाधारणपणे करण्यात येणार्या उपायांत विष्णु विवाह किंवा वटवृक्ष विवाह किंवा कुंभ विवाह केला जातो. वैदिक मंत्र / पौराणिक मंत्र / बीज मंत्र किंवा मंगळ नामावली, तसेच अंगारक स्तोत्र, ऋणमोचन मंगळ स्तोत्र, चंद्र मंगळ स्तोत्र, भौम मंगळ स्तोत्र वगैरेंचे पठण करून मंगळ दोषाची तीव्रता कमी करता येते. मंगळ यंत्राचा देखील यासाठी उपयोग होऊ शकतो.
मंगळाच्या कुंडलीत मंगळाचे वाईट परिणाम दिसतच नाहीत, असे माझे म्हणणे नाही. विवाहात विलंब, घटस्फोट, विवाहसौख्यात न्यूनता, अनैतिक संबंध, पती-पत्नीतील वाद या सगळ्या गोष्टींसाठी प्रामुख्याने मंगळच जबाबदार असतो. पण प्रत्येक वेळी मंगळ या सगळ्या गोष्टी अगदी टोकाला नेतो असे नाही. शिवाय काही कुंडल्यांमध्ये शनि, राहू, हर्षल यांसारखे इतर पापग्रहसुद्धा वैवाहिक सौख्याची हानी करतात.
कुंडलीत मंगळ असला तरी, तो ज्या स्थानात आहे, त्या व्यतिरिक्त विवाहसौख्याशी निगडीत इतर 5 ते 6 स्थानांचा विचार केल्याशिवाय ज्योतिषाने एकांगी निर्णय देण्याची घाई करू नये.
फक्त मंगळाची कुंडली म्हटली की धास्तावून जाणे आणि पारंपरिक विचारांना शरण जाऊन प्रसंगी चांगले स्थळही नाकारणे हे प्रकार थांबले पाहिजेत.
फलज्योतिषाचा विचार आणि विवाहासाठी कुंडली जुळविण्याची रीत 105 वर्षांपूवीं जेव्हां पंचांगें अस्तित्वात आलीं तेव्हापासून रूढ झाली असे म्हणता येईल. त्या काळांतील सामाजिक जडणघडणीचा विचार केला तर आजचा काळ आणि त्या काळातील विवाहसंबंधित मानसिकता यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. पूर्वीच्या काळी समाजात पुरुषप्रधानतेचा खूप मोठा पगडा होता आणि सर्व बाबतीत पुरुषांचंच वर्चस्व मान्य केलं जात होतं. पण आता मात्र स्त्रिया पुरुषांपेक्षा अनेक बाबतीत वरचढ असलेल्या दिसतात कारण त्यांच्या गुणांना आता वाव मिळू लागला आहे. आणि पुरुषही हे मान्य करू लागले आहेत. तेव्हां मुलामुलींची लग्ने खूप लवकर लहान वयांत होत असत. त्यामुळे त्यांची वैयक्तिक विचारसरणी व व्यक्तिमत्व विचारांत घेतलं जात नसे; आणि आतां मुलामुलींचा स्वभाव व व्यक्तिमत्वाचा विचार अपरिहार्यपणे करावा लागतो. त्यामुळे, केवळ गुणमीलनावर भरवसा करणे अव्यावहारिक ठरेल.
जकातदार सर म्हणतात त्याप्रमाणे, ‘think logically and implement astrologically’ याच धर्तीवर विवाह जमवताना मंगळाचा विचार करणं ही आजच्या काळाची गरज आहे.