आज आपण चौथ्या स्थानातील मंगळाचा विचार करू या.
चौथे स्थान हे भौतिक सुख, जमीन-जुमला, वाहन, घर, कौटुंबिक सुख, माता, मातेचे आरोग्य आणि समृद्धी, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दर्शवते. नैसर्गिक कुंडलीत चतुर्थ स्थानात कर्क रास येते. कर्क रास ही मंगळाची नीच रास आहे. त्यामुळे, चौथ्या स्थानातील मंगळ अशुभ फले देतो. परंतु, तो जर स्वतःच्या (मेष, वृश्चिक), गुरुच्या (धनु, मीन) किंवा सूर्याच्या (सिंह) राशीत असेल, तर तो चांगली फले देऊ शकतो. चतुर्थात वृश्चिकेच्या मंगळाला मंगळ दोष राहात नाही. चतुर्थ स्थानातील अशुभ मंगळ हृदय रोग आणि रक्ताभिसरणाच्या समस्या दाखवतो.
वैवाहिक सुखाच्या दृष्टीने चतुर्थ स्थानातील मंगळ महत्त्वाचा आहे, कारण हे भौतिक सुखाचे स्थान आहे. शिवाय येथील मंगळाची दृष्टी सप्तम (विवाह), दशम (करियर) आणि एकादश (लाभ, मैत्री) स्थानावर असते. चतुर्थात अशुभ मंगळ असल्यास कुटुंब सौख्य आणि वाहन सौख्य कमी होते, जन्मभूमीपासून आणि मातेपासून लांब राहावे लागते. नातेवाईकांमुळे वैवाहिक सुखात कमतरता येते. चतुर्थात मंगळ असलेला जातक तापट, संशयी आणि शंकेखोर स्वभावाचा असतो. हा मंगळ वैवाहिक सुखात मोठ्या मतभेदासाठी जबाबदार ठरू शकतो. अशा पुरुषांचा दुसर्याच्या पत्नीशी गैर संबंध येऊ शकतो. चतुर्थातील मंगळ शुभ दृष्ट असल्यास असा पती आपल्या पत्नीच्या कह्यात राहतो. या स्थानातील मंगळाची दृष्टी सप्तम स्थानावर येत असल्यामुळे पती-पत्नीत सुसंगतता किंवा compatibility नसते. या स्थानातील मंगळाचे खराब परिणाम सप्तम आणि अष्टम स्थानातील मंगळाच्या तुलनेत कमी असतात.
चतुर्थ स्थानातील मंगळ-शनि युती निवांतपणा देत नाही, वडीलोपार्जित संपत्तीबाबतचा झगडा कोर्टापर्यंत जाऊ शकतो. येथील मंगळ-शुक्र युती चारित्र्य आणि प्रियजनांचा सहवास या बाबतीत हानी करतो. बुधाशी युतीत असलेला मंगळ जातकाला व्यसनाधीन बनवतो. येथे सूर्याशी युतीत असलेला मंगळ जातकाला संपत्ती, नातेवाईक आणि सर्व प्रकारच्या सुखांपासून वंचित ठेवतो. तो दुःखी असतो आणि कोणाशीही त्याचे पटत नाही. याविरुद्ध जर हा मंगळ गुरुशी युती करत असेल, तर नातेवाईक आणि मित्रांशी त्यांचा सुसंवाद असतो. तो स्थिर बुद्धीचा आणि विनम्र असतो. चतुर्थ स्थानातील मंगळ-राहू युती माता-पित्याचे सुख देत नाही. तो द्वीभार्या योग देतो, सुखापासून वंचित ठेवतो. कारकिर्दीच्या दृष्टीने ही युती अशुभ फले देते. ही युती नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता लाभू देत नाही, त्यामुळे नेहमीच आर्थिक चणचण राहते. त्यांचे संततीशी संबध चांगले राहात नाहीत.