आत्तापर्यंत आपण मंगळाची विविध चार स्थानांतील फले पाहिली. आज आपण मंगळाची पाचव्या स्थानातील फले बघणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की, कुंडलीत मंगळ १२, १, ४, ७, ८ स्थानात असला तर ती कुंडली मंगळदोषाची होते. या स्थानांतील मंगळाची सप्तम किंवा अष्टम स्थानावर दृष्टी येत असल्यामुळे लग्नजीवनात विसंवाद यासारखी फळे तो इतर भावस्थ (१२, १, ४, ७, ८) मंगळाप्रमाणेच देतो.
पाचवे स्थान हे विद्या आणि संततीचे स्थान आहे. त्यामुळे स्त्रीच्या कुंडलीत पंचम भावस्थ मंगळ हा मंगळ दोषाची फले देतो. त्यामुळे स्त्रीच्या कुंडलीत या स्थानातील मंगळ विशेष अभ्यासला गेला पाहिजे. हा मंगळ पतीशी विसंवाद, संतानहीनता, गर्भपात, शस्त्रक्रियेने प्रसूती असे योग दाखवितो. परंतु पुरुषाच्या कुंडलीत त्याला एवढे महत्त्व नाही.
पाचवे स्थान हे प्रणय आणि प्रेमसंबंधाचे स्थान आहे. या स्थानातील मंगळ प्रेमसंबंधात आक्रमकता आणि उतावळेपणा दाखवतो. हा मंगळ शुक्राशी युतीत असेल तर जोडीदाराविषयी आकर्षण जास्त असते. हा मंगळ हर्षलशी युती करत असला तर जातकाच्या प्रेमसंबंधाविषयी अतिरेकी कल्पना असतात.
कर्क आणि सिंह लग्नाला मंगळ हा ग्रह योगकारक होत असल्यामुळे तो तितकीशी अशुभ फले देत नाही. हा मंगळ अपार कष्ट करण्याची क्षमता आणि तांत्रिक विषयात गती देतो. लग्नजीवनाचा विचार करताना पंचमातील मंगळ आणि सप्तमेश यांच्या संबंधाचा विचार अवश्य केला पाहिजे. पंचमातील मंगळ हा जातकाला तीव्र उदराग्नी देतो. वात आणि कफ प्रकृती देतो. जातक अतिशय महत्त्वाकांक्षी असतो. परंतु त्याच्या इच्छा पूर्ण होताना दिसत नाहीत.